मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रविवारी (२८ जून) मुंबई उपनगराचा दौरा करत विक्रोळी परिसरातील मनसेच्या दोन शाखांचे उद्घाटन केले. ईशान्य मुंबईतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेला हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज यांचा या मतदारसंघातील हा पहिलाच दौरा होता.
यापूर्वी या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनीही या भागाचा दौरा केला होता. राज यांनी विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातील मनसे शाखेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी शाखा कार्यालयाच्या अभ्यागत नोंदवहीत स्वाक्षरी करून शुभेच्छा नोंदवल्या.
दौ-यादरम्यान परिसरात मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शाखा उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
















