परभणी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून कोकणात जाणा-या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नांदेड-रत्नगिरी दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याच्या मागणीसाठी दि. २८ रोजी नांदेड विभागातील मुख्य वाणिज्य प्रबंधक देवीकुमार दास, मुख्य परिचालन प्रबंधक कुमार गौरव आणि अतिरिक्त परिचालन प्रबंधक श्रीनिवास सुर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. नांदेड-रत्नागिरी या विशेष रेल्वेला मनमाड-कल्याण-पनवेल किंवा लातूर-पुणे-पनवेल या मार्गावरून मराठवाड्यातील प्रवाशांसाठी कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता १०, १२, १४, १८, २०, २२ आणि २४ सप्टेंबर रोजी नांदेड-रत्नागिरी दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात यावी. गणपती उत्सवाच्या काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकडे जाणा-या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र मराठवाड्यातून अद्याप कोकणसाठी थेट रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांना रेल्वे बदलत व त्रास सहन करून प्रवास करावा लागतो. ही विशेष रेल्वे सुरू झाल्यास गणपती उत्सवासाठी कोकणात जाणा-या मराठवाड्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल व प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी होणार आहे. नांदेडसह परभणी, पूर्णा, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणपती उत्सव जवळ आल्याने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन आणि आरक्षण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य रेल्वेने तातडीने मध्य रेल्वे व कोकण रेल्वेशी समन्वय साधून नांदेड-रत्नगिरी विशेष रेल्वेची घोषणा करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.
















