मुरुड : प्रतिनिधी
गावातील मुख्य बाजारपेठेत डॉ. छल्लानी यांच्या दवाखान्यासमोर असलेल्या ग्रामपंचायतच्या नाल्याला गेली कित्येक वर्षे मोठे भगदाड पडले आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे दि. १४ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एक तरुण व बालक या नाल्यात पडून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका युवकाचा त्याच्या लहान मुलीसह तोल जाऊन तो ग्रामपंचायतीने तयार केलेल्या उघड्या आणि भगदाड असलेल्या नाल्यात पडला. या अपघात युवक आणि बालक दोघांनाही मोठी दुखापत झाली आहे. गंभीर अवस्थेतील बालकाला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठा अनर्थ टळला, अन्यथा जीवितहानी होऊ शकली असती. ही पहिली घटना नाही. यापूर्वीही याच ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला तोंडी व लेखी तक्रारी देऊनही केवळ ‘राधारमण पेढा’ खाऊ घालून विषय टाळण्याचे काम करण्यात आले आहे.
बाजारपेठेच्या मध्यावर, रुग्णालयाजवळ आणि शाळकरी मुले, महिला, वृद्ध यांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी असा मृत्यूचा सापळा ठेवणे म्हणजे प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. जखमी बालक व युवक यांच्या उपचाराचा सर्व खर्च ग्रामपंचायतीने केला असून तात्काळ त्या खड्ड्याची दखल घेऊ असे देखील आश्वासन दिले आहे. गेली किती वर्ष या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तात्काळ त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करुन नाल्याची दुरुस्ती करावी, नाल्यावर झाकण बसवण्यात यावे. या हलगर्जीपणासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिका-यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यापुढे होणा-या कोणत्याही जीवितहानीस संपूर्णपणे ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांनी सांगीतले.
















