निलंगा : प्रतिनिधी
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा यांच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात शहरात महामोर्चा काढून शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. भर पावसात निघालेल्या या महामोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले.
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण विरोधातील महामोर्चा कासारशिरशी मोड येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात आला. समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये, न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल राज्य सरकारने फेटाळावा, आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी करून रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, डी-रिझर्व्हेशन प्रक्रिया तात्काळ थांबवावी, शिक्षण, शिष्यवृत्ती व संशोधनाच्या संधी वाढवाव्यात, संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार अनुसूचित जातींचे हक्क अबाधित ठेवावेत, खाजगी व सहकार क्षेत्रासह खाजगी अभिमत विद्यापीठांमध्ये आरक्षण धोरण लागू करावे, शासकीय, निमशासकीय, विद्यापीठ व सार्वजनिक क्षेत्रातील सर्व रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, खुल्या प्रवर्गातून झालेल्या भरतीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अनुसूचित जातींसाठी लागू करण्यात आलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी तसेच बार्टी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी कमी करण्यात आलेला कोटा पूर्ववत सुरू ठेवावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा संविधानप्रेमी व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. या आंदोलनात अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे विलास सूर्यवंशी, अंकुश ढेरे, रजनीकांत कांबळे, प्रा. रोहित बनसोडे, दाजीबा कांबळे, अर्जुनप्पा कटके, डॉ. प्रमोद हतागळे, काशिनाथ जाधव, माधव लांडगे, सतीश कांबळे, रामलिंग पटसाळगे, दिगंबर सूर्यवंशी, धम्मानंद काळे, प्रकाश कांबळे, बंटी कांबळे, लहू ढेरे, देवदत्त सूर्यवंशी, विजयकुमार सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी, जयभीम गायकवाड, देविदास धैर्य, अनंत कांबळे, विलास वाघमोडे, उल्हास वाघमोडे, लक्ष्मण कांबळे ,भगवान कांबळे, लक्ष्मण वडगावकर, अंगद कांबळे ,संजय सोनकांबळे, तानाजी सुरवसे, अनिल कांबळे ,राहुल मोरे, सुभाष कांबळे, मलिंग गोपाळे, सुनील गायकवाड ,अंगद गवळी ,युवराज जोगी, धनराज कांबळे, धनराज बनसोडे, देविदास पतंगे, भीमराव सूर्यवंशी, गणेश गोपाळे, वसंत गायकवाड ,बालाजी कांबळे, झटींग म्हेत्रे, बाबासाहेब कांबळे, निखिल धैर्य यांच्यासह विविध आंबेडकरवादी संघटना, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
















