लातूर : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन दिड महिना उलटून गेला. जिल्हयात अद्याप पेरणी योग्य व पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांच्या पाणी पातळीत वाढ होण्या योग्य दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे गावांची तहाण भागवणारे ३७६ हातपंप व १६८ विद्यूत पंप असे ५४४ विद्यूत व हात पंप बंद आहेत. यामुळे पावसाळयात अधिग्रहणांची संख्या वाढू लागली आहे. नागरीकांना दिलासा मिळण्यासाठी जिल्हयात दमदार पावसाची गरज आहे.
लातूर जिल्हयात जून महिना सोडला तर इतर दिवशी पावसाळयात उन्हाळयाची धग जाणवत आहे. जिल्हयात गेल्या दिड महिण्यात केवळ १२१.३ मि.मि. पाऊस झाला आहे. या तुटपुंज्या पावसाचे पाणी अद्याप जमिनीत न मुरल्याने ग्रामीण भागात दिवसा गणीक वाडया, तांडे व गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी अधिग्रहणाच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही जाणवत आहे. पावसाअभावी अनेक शेतक-यांनी पेरणी केलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात पेरण्या व पिण्याच्या
पाण्यासाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सोबत प्रती हातपंप दुरूस्तीसाठी ४ हजार रूपये, तर विद्यूत पंप दुरूस्तीसाठी ८ हजार रूपये असा करार केला जातो. पंप नादुरूस्तीची तक्रार आल्यानंतर यांत्रीकी विभागाची टिम ३ ते ४ दिवसात पंप दुरूस्त करून कार्यरत करतात. त्यासाठी ग्रापंचायतींनी यांत्रीकी विभागाशी करार करणे आवश्यक आहे.
















