अहमदपूर: प्रतिनिधी
या शहरातील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कर्ज व्यवहारात सुमारे ९९ लाख रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अहमदपूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रथम खबर अहवाल (एफआयआर) नोंदविला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर २०२१ ते ८ ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत बुलढाणा अर्बन सोसायटीच्या अहमदपूर शाखेतील कर्ज व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जदारांच्या नावावर कर्ज मंजूर करून त्यातील रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचा तसेच कर्जाच्या परतफेडी बाबत दिशाभूल झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित शाखेतील तीन अधिकारी व कर्मचा-यांच्या भूमिकेबाबतही तक्रारीत संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीनुसार एकूण ९९ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ७३९/२०२६ नोंदवण्यिात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विनोद म्हेत्रेवार यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता ही कर्मचारी व अधिकारी यांची योग्य ती तपासणी करण्यात आल्या नंतर आर्थिक फसवणूकी बाबद स्पष्ट होणार असून, संबंधित सर्व बाबींचा पोलिस तपास सुरू आहे.
















