22.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeसंपादकीयभारत-इस्रायल संंबंध

भारत-इस्रायल संंबंध

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौ-यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा गत नऊ वर्षांतील हा दुसरा इस्रायल दौरा. जुलै २०१७ मध्ये पहिल्यांदा मोदी इस्रायल दौ-यावर गेले होते. त्या वेळी दोन्ही देशांतील संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्यात आला होता. या वेळी विज्ञान-तंत्रज्ञान, नवनिर्मिती, कृषि, संरक्षण, व्यापार अशा विविध क्षेत्रांत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा करून दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ करण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे. इस्रायलच्या दौ-यावर जाण्यापूर्वी मोदी यांनी दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील याची खात्री असल्याचे वक्तव्य केले होते. बुधवारी पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा करणार आहेत. सध्या इस्रायल जागतिक पातळीवर अनेक आव्हानांना सामोरे जात असताना भारताबरोबरचे संबंध महत्त्वाचे राहतील असे मानले जात आहे. या दौ-यात इस्रायलकडून आयर्न डोम सुरक्षा प्रणाली मिळवण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसद, नेसेटा संबोधित करताना भारताच्या इस्रायलशी असलेल्या घनिष्ठ संबंधांना उजाळा दिला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली नागरिकांबद्दल शोक व्यक्त करून मोदी यांनी दहशतवादावर प्रहार केला.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि समन्वित जागतिक कृतीची गरज आहे. कारण दहशतवाद कुठेही असला तरी तो सर्वत्र शांततेला धोका निर्माण करतो, असे मोदी म्हणाले. नागरिकांच्या हत्येचे कोणत्याही कारणाने समर्थन करता येणार नाही. आपण दहशतवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू शकत नाही. ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी जीव गमावला त्याबद्दल भारतीय जनतेच्या वतीने मोदींनी सहवेदना व्यक्त केल्या. भारत या क्षणी आणि पुढील काळात पूर्ण विश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही दिले. दहशतवादाचा उद्देश समाजांना अस्थिर करणे, विकासात अडथळा आणणे आणि विश्वासाला तडा देणे असतो. म्हणून दहशतवादाचा सामना करण्यासाठी सतत आणि समन्वित जागतिक कृती आवश्यक आहे. दहशतवाद कुठेही असला तरी सर्वत्र शांततेला धोका निर्माण करतो. भारतानेही दीर्घकाळ दहशतवादाचे दु:ख सहन केले आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचे आणि इस्रायली नागरिकांसह निष्पाप लोकांचे बळी गेल्याचे स्मरण पंतप्रधान मोदींनी केले. भारत शाश्वत शांतता आणि प्रादेशिक स्थिरतेला हातभार लावणा-या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो, असे त्यांनी सांगितले. इस्रायलने आपले सर्वांत प्रगत आणि आतापर्यंत जगापासून लपवून ठेवलेले ‘गोल्डन होरायझन’ हे हवेतून डागले जाणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र भारताला देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अनेक देशांनी या शस्त्रासाठी इस्रायलकडे मागणी केली होती. पण इस्रायलने ही तंत्रज्ञान भागीदारी फक्त भारतासोबत करण्याचे निश्चित केले आहे. ‘गोल्डन होरायझन’ हे असे क्षेपणास्त्र आहे जे ‘सुखोई’सारख्या लढाऊ विमानामधून डागले जाऊ शकते. भारताचे ‘ब्रह्मोस’ हे जगातील सर्वांत वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते.

त्याचा वेग ३ मॅक आहे. ‘गोल्डन होरायझन’चा वेग ५ मॅकपेक्षाही जास्त आहे. या प्रचंड वेगामुळे जगातील कोणतीही रडार प्रणाली किंवा क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा त्याला रोखू शकत नाही. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या भूमीतील खोलवरचे बंकर्स, मजबूत किल्ले आणि अत्यंत सुरक्षित अणुप्रकल्प नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. इस्रायलच्या क्रांतिकारी ‘आयर्न बीम’ या लेझर आधारित संरक्षण प्रणालीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. ‘गोल्डन होरायझन’सारखे शस्त्र मिळणार असल्याने भारताच्या संरक्षण विभागाची ताकद वाढणार आहे. पंतप्रधान मोदींचा हा इस्रायल दौरा केवळ राजनैतिक सौजन्यापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या लष्करी सामर्थ्याला नवी दिशा देणारा असणार आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचे अनुभव, ड्रोन हल्ले आणि लांब पल्ल्याच्या चिनी क्षेपणास्त्रांचा धोका लक्षात घेता भारत इस्रायलकडून आयर्न डोम आणि आयर्न बीमसारखे तंत्रज्ञान मिळवणार आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी गाझापट्टीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, इस्रायलने संपूर्ण गाझा उद्ध्वस्त केला आहे. ७५ हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. पंतप्रधान मोदी सध्या इस्रायलमध्ये आहेत. त्यांनी पॅलेस्टिनी जनतेच्या अधिकाराबद्दल भाष्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताचा इतिहास पाहता इस्रायल हा भारताचा कधीच नैसर्गिक मित्र नव्हता. पण गत दशकभरात सारी गणिते बदलली आहेत. नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक या देशाशी मैत्री वाढवली आहे. मोदी यांच्या कारकीर्दीमध्ये इस्रायल हा भारताचा महत्त्वाचा मित्र ठरला आहे. गाझापट्टीमध्ये इस्रायल-पॅलेस्टिन संघर्ष सुरू आहे. इस्रायलच्या विरोधात अनेक इस्लामिक देश एकत्र येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला तोंड देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी एक वेगळा इस्लामविरोधी गट स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या गटात भारत, रशिया आणि आणखी काही देश असणार आहेत.

त्यादृष्टीनेही मोदींचा दौरा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांत गेल्या काही वर्षांत व्यापारी संबंधसुध्दा चांगल्या प्रमाणात विकसित झाले आहेत. इस्रायलमध्ये निर्यात करणारा भारत हा आशियामधील चीननंतरचा दुसरा देश ठरला आहे. इस्लामिक राष्ट्रांच्या दडपशाहीसमोर झुकायचे नाही हा इस्रायलचा एक कलमी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात त्यांना मोदीसारखा मित्र मिळाला तर त्यांना तो हवाच आहे. संरक्षण वस्तूंच्या उत्पादनामध्ये इस्रायल आघाडीवर आहे. त्यांची मदत भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारत आणि इस्रायलमधील वाढती मैत्री पाकिस्तानसह अनेक इस्लामिक राष्ट्रांना खुपणारी असली तरी ते काहीच करू शकणार नाहीत. मोदी यांच्या इस्रायल दौ-यामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीला एक वेगळे परिमाण मिळणार यात शंका नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR