माणगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (९ ऑगस्ट) सकाळी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. माणगावला महामार्गाचे काम पाहिल्यानंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. १५ वर्षांपासून ऐकतोय मुंबई-गोवा महामार्ग होणार आहे. हा महामार्ग कधी पूर्ण होणार, कोकणवासीयांचे हाल कधी संपणार, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम १५ वर्षांनंतरही पूर्ण न झाल्याबद्दल राज ठाकरे यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला. राज ठाकरे मनसे शाखांचे उद्घाटन आणि मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते.
यावेळी त्यांनी रखडलेल्या महामार्गावरून सरकारला लक्ष्य केलेच शिवाय तिस-या मुंबईवरूनही सरकारवर टीकेचे बाण सोडले. तिसरी मुंबई कुणासाठी बनवली जात आहे? असा सवाल त्यांनी केला. सरकार स्थानिकांशी चर्चा करतंय का? बाहेरचे लोक आणायचे आणि त्यांना पोसायचे, हेच सुरू आहे. त्यांच्यासाठी तिसरी मुंबई बनवली जात आहे. यावेळी तिस-या मुंबईत काय काय येणार, याची राज ठाकरे यांनी यादी वाचली आणि हे पेण, पनवेल, उरणमधील लोकांना-युवकांना माहीत आहे का, इथं कोणता विकास होतोय, याची स्थानिकांना कल्पना आहे का, असे सवाल त्यांनी केले. यावरून जमिनी विकणे एवढाच धंदा महाराष्ट्रात सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या निमित्ताने एकदा नितीन गडकरी यांना विचारले होते. तेव्हा कंत्राटदार कंटाळून जातात, असे उत्तर गडकरी यांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावरून राज ठाकरे यांनी गडकरींनाही सवाल केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार का कंटाळून गेले, याचे उत्तर तुम्हीच द्यावे, असे सुनावले आहे. या महामार्गावरून सर्व लोकप्रतिनिधी एकत्र असते तर कधीच महामार्ग झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
















