जळगाव : प्रतिनिधी
इराण-अमेरिका यांच्यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळाला आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोने-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५४ हजार ४१० रुपयांवर गेला आहे. सोनं आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

