लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आज दि. ४ डिसेंबरपासून सुरु होत असून लातूरच्या नाट्य रसिकांना १२ दर्जेदार नाटकांची मेजवनी लाभणार आहे.
मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन पद्मभूषन डॉ. अशोक कुकडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. चंद्रकांत शितोळे, डॉ. ज्योत्सना कुकडे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ६ वाजता होणार आहे. उद्घाटनानंतर लगेचच जयंत दळवी लिखीत व संजय अयाचित दिग्दर्शित ‘बॅरिस्टर’ हे नाटक लातूरची रजनीगंधा फाऊंडेशन ही संस्था सादर करणार आहे. या नाट्य महोत्सवाचा नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे, लातूर केंद्राचे समन्वयक ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी केले आहे.