लातूर : प्रतिनिधी
चाकूर तालुक्यातील सुगाव येथील प्रगतशील, नाविन्यपूर्ण व प्रयोगशील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च कृषी सन्मान असलेला ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल (डोम) येथे कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण समारंभात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील तसेच भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार, कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कृषी उत्पादनवाढ तसेच शेतकरी हितासाठी केलेल्या उल्लेखनीय व बहुमोल कार्याची दखल घेऊन शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा बहुमान स्वीकारताना शिंदे यांच्यासमवेत त्यांची कन्या सौ. पल्लवी गव्हाणे तसेच जुळे नातू आलोक आणि श्लोक उपस्थित होते. या पुरस्कारामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
















