Homeलातूरसमस्त लातूरकरांनी वाहिली डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

समस्त लातूरकरांनी वाहिली डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लातूर : प्रतिनिधी
समाज जीवनात वावरताना एखाद्या महनीय व्यक्तीबद्दल आजमितीस शिक्षणमहर्षी, ऋषितुल्य, अजातशत्रू, नि:स्पृह  कर्मयोगी, नि:स्वार्थी  व्यक्तिमत्व, अशी अनेक  विशेषणे लावली जातात. मात्र, हे सर्व विशेषणे किंबहुना यापेक्षाही अधिक विशेषणांनी गौरविले जावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी दिवंगत माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील हे होते, अशा  शब्दात आपण समस्त लातूरकरांच्या वतीने  ‘लातूर पॅटर्न’चे आधारस्तंभ डॉ. गोपाळराव पाटील यांना रविवारी लातुरात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
येथील दयानंद सभागृहात रविवार, दि. १० मे रोजी डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, डॉ. अजय जाधव, धनंजय बेंबडे, अ‍ॅड. प्रदीप मोरे यांसह आपण समस्त लातूरकरांच्या वतीने सार्वजनिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. गोपाळराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांनी शिक्षण महर्षी, नि:स्पृह  कर्मयोगी  डॉ. गोपाळराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र आदरांजली वाहिली. माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, शिक्षण शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव, अ‍ॅड. प्रदीप मोरे, लॉयन्स क्लबचे धनंजय बेंबडे, प्रा. विद्याधर कांदे पाटील यांनी आपल्या मनोगतातून डॉ. गोपाळराव पाटील यांचे कार्य  महाकाय वटवृक्षासारखे असल्याचे नमुद  केले.  स्व. डॉ. गोपाळराव पाटील यांचे सुपुत्र सच्चीदानंद पाटील यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना दिवंगत आप्पांबद्दल समस्त लातूरकरांच्या मनात असलेली आपुलकी पाहून आपल्याला  गहिवरून आल्याचे सांगितले.
आपले आप्पा जीवनमूल्याचे एक आदर्श विद्यापीठ होते, असेही ते म्हणाले. याप्रसंगी लक्ष्मीरमण  लाहोटी, डॉ. हरिप्रसाद सोमाणी, स्नेहलता देशमुख, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. मन्मथ भातांब्रे,  शिवाजीराव भोसले, प्रा. गोविंदराव घार, अ‍ॅड. उदय गवारे, रागिणी यादव,  प्रा. बापूसाहेब रितापुरे  यांसह  अनेक मान्यवरांनी डॉ. गोपाळराव पाटील यांना आदरांजली वाहिली. सूत्रसंचालन  देवणीकरख, धनंजय बेंबडे यांनी तर डॉ. बाळासाहेब जाधव यांनी  आभार मानले. यावेळी विनायकराव पाटील, शहाजीराव पाटील,  डॉ. शिवाजीराव सूर्यवंशी,  डॉ. प्रेमचंद मालपाणी, भारत माळवदकर, अजय गोजमगुंडे, जगदीश हेड्डा यासह  लातूरच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR