मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर पक्षाला सावरण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अत्यंत साधेपणाने व शोकाकुल वातावरणात लोकभवनावर झालेल्या शपथविधी सोहळ््यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा अजित पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या ११ व्या व पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सर्व मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर या शपथविधीस उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुरूवारी त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईकडे रवाना झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची विधानभवन येथे शनिवारी दुपारी बैठक पार पडली.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यात महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा अजित पवार यांना देण्यात आले. छगन भुजबळ यांनी सूचक म्हणून हे दोन्ही ठराव मांडले तर दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदी वरिष्ठ नेत्यांनी त्यास अनुमोदन दिले. एकमताने दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले. यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी भेट घेतली. हे पत्र व ठराव त्यांना देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना अवगत केले. सायंकाळी ५ वाजता अतिशय साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडला.
शरद पवार, सुप्रिया सुळे अनुपस्थित
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खा. सुप्रिया सुळे तसेच पवार कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. शरद पवार यांनी शनिवारी सकाळीच पत्रकारपरिषद घेऊन आपल्यास या शपथविधीची कोणतीही माहिती नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत काय झाले त्याचा तपशील उघड झाला नाही.
‘अजित दादा अमर रहे’ च्या घोषणा
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी लोकभवन येथे शपथविधीस उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या. दरम्यान, शपथ घेताना ईश्वरसाक्ष किंवा गांभीर्यपूर्वक दृढकथन अशा दोन पद्धतीने घेता येते. सुनेत्रा पवार यांनी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की, अशी सुरूवात करत शपथ घेतली.
दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेने पुढे चालत राहीन
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असे सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरश: भरून येत आहे.दादांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
अर्थखाते तूर्त मुख्यमंत्र्यांकडेच
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. अजित पवारांकडे असलेले नियोजन आणि वित्त हे खाते तूर्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे.

