नवी दिल्ली : महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत आता स्मृती मानधना अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यादरम्यान, भारतीय सलामीवीर मंधानाने न्यूझिलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत हा टप्पा गाठला आहे.
बेट्सला मागे टाकण्यासाठी स्मृती मानधनाला केवळ सात धावांची गरज होती. आजच्या सामन्यात तिने तिस-या षटकात एका शानदार चौकारासह ही कामगिरी पूर्ण केली. तिने भारताला सामन्यात दमदार सुरुवात करून दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धेतही स्मृतीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेतील ती दुस-या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली होती. तिने या स्पर्धेत एकूण २१३ धावा केल्या. हाँगकाँग-चीनविरुद्ध शतकही झळकावले होते. आता स्मृती मानधना महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधनाने पहिल्याच षटकात चौकार मारून सुरुवात केली. मात्र, त्या चौकारानंतर तिने फलंदाजीची धुरा शफाली वर्माकडे सोपवली. बांगलादेशच्या गोलंदाजांवर आक्रमकपणे धावा करण्यास वाव दिला. तिस-या षटकात स्मृती मानधनाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सलग दोन चौकार फटकावले. त्यातील एका चौकाराने तिने विश्वविक्रमाला गवसणी घातली. यानंतर तिने मुक्तपणे फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पॉवरप्ले दरम्यान १९ चेंडूंत ३७ धावा करून मंधाना बाद झाली; पण टीम इंडियाला दमदार सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी तिने अचूकपणे पार पाडली.
टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही गाठला
मंधानाने दोन षटकार ठोकले आणि भारताने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. या षटकारांमुळे मंधानाने महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला; यासह सोफी डिव्हाईन, डिएंड्रा डॉटिन आणि चमारी अथापथू यांच्या यादीत तिचा समावेश झाला आहे.
















