लातूर : प्रतिनिधी
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात प्रकल्पांची (प्रोजेक्टची) मूळ शुद्धता व विश्वासार्हता राखणे हे एक मोठे आव्हान बनले आहे,’ असे प्रतिपादन येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केलीे. जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित विद्यापीठस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे बोलत होते. पुढे बोलताना डॉ. गव्हाणे म्हणाले की, ‘फिल्ड प्रोजेक्ट’ आणि ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ मुळे मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय प्रकल्पांच्या माध्यमातून व्यावहारिक संशोधन करावे, तसेच डिजिटल युगातील आशय निर्मिती (कंटेंट रायटिंग), संपादन आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मा. म. जाधव, प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, आयोजक डॉ. धीरज कोतमे आणि डॉ. सतीश डांगे उपस्थित होते. या कार्यशाळेत विद्यापीठातील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन डॉ. माया सरवदे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. धिरजकुमार कोतमे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. दिलीप गुंजरगे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने मोलाचे सहकार्य केले.
















