लातूर : प्रतिनिधी
वसुंधरा प्रतिष्ठान संचलित ‘वसुंधरा वृक्षरूपी’ गणेश मंडळाच्या वतीने नेहमीच नवखे आणि नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात. लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढावे यासाठी या गणेश उत्सव काळात या गणेश मंडळाने अनोखे उपक्रम हाती घेतले आहे. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून एक फळाचे झाडं दिले जात आहे. सदरील झाड गणपती बाप्पाच्या नावाने लावून त्याचे संवर्धन करण्याची विनंती केली जाते आहे. याला भरभरून प्रतिसाद मिळत असून, दररोज जवळपास ५०० फळांची रोपं प्रसाद म्हणून वाटप होत आहेत, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या अकरा वर्षांपासून लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड, संवर्धन आणि जनजागृती करण्याचे काम अविरतपणे करते आहे. या प्रतिष्ठान अंतर्गत झाडाचा गणपती, झाडांचे वाढदिवस, खिळेमुक्त झाडं अभियान, झाडांसोबत मैत्री दिवस, झाडांसोबत रक्षाबंधन, झाडांचे व्हॅलेंटाईन डे, एक विद्यार्थी-एक वृक्ष उपक्रम, एक घर-दोन झाडं उपक्रम, सेल्फी विथ ट्री आदी उपक्रम राबविले जातात. झाडांचा गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात या प्रतिष्ठानने आणली. २०१७ पासून लातूर शहरात झाडाचा गणपती साकारला जातो.
या अनुषंगाने देव देवळात नाही, देव दगडात नाही तर देव झाडात आहे अशी संकल्पना मांडली गेली. झाडांचा गणपती ही संकल्पना आता सर्वदूर पोहोचली आहे. वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाच्या वतीने विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. केवळ गणेश उत्सव कालावधीत नव्हे तर वर्षभर विविध सामाजिक उपक्रम हे मंडळ हाती घेते.
















