तेहरान : १३ दिवसांच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवले आहेत. यानंतर, इराण लष्करानेही प्रत्युत्तरात्मक हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवल्यामुळे चर्चा पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. यातच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणा-या नवीन किंवा पर्यायी मार्गाचा कोणताही प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
इराणने हे स्पष्ट केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुद्यावर कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. तसेच हा सागरी मार्ग त्याच्या युद्धपूर्व स्थितीत परत येणार नाही. हल्ले थांबल्यानंतर आता दोन्ही देश वाटाघाटींच्या दिशेने गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. इराणने अमेरिकेशी करार करण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवावे, अशी इराणची इच्छा आहे. ही त्यांची पहिली अट आहे. दुसरी अट म्हणजे गोठवलेला निधी परत मिळवणे. तिसरा मुद्दा म्हणून इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इराणने मध्यस्थ पाकिस्तानला सांगितले आहे की, अटींच्या अधीन राहून जिनिव्हा, दोहा किंवा इस्लामाबाद येथे चर्चा करण्यास ते तयार आहेत, अशी माहिती काही मीडिया रिपोट्समधून समोर आल्याचे बोलले जात आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण
इराणच्या संसदेच्या उपसभापतींनी स्पष्ट करत सांगितले की होर्मुझची सामुद्रधुनी तिच्या युद्धपूर्व स्थितीत परत येणार नाही. आता इराण या सागरी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करेल. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दावा केला आहे की. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे संपूर्ण नियंत्रण आहे. इराणच्या परवानगीशिवाय कोणीही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकत नाही. इशारा दिल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीत सहा जहाजे थांबवण्यात आली.
पुढील चर्चा गरजेची
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याबाबत ओमान आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचे दिसत आहे. एका अधिका-यांने म्हटले आहे की, कोणत्याही परिणामासाठी पुढील चर्चा आवश्यक आहे. सर्वांचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझवरील भूमिकेकडे लागले आहे.
















