लातूर : प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात शिक्षकांनी एआयचा योग्य आणि जबाबदारीने वापर करून अध्यापन अधिक प्रभावी, आकर्षक आणि विद्यार्थी-केंद्रित करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे शिक्षकाचे पर्याय नसून त्यांचे सामर्थ्य वाढविणारे साधन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे सहाय्यक साधन आहे. मानवी सर्जनशीलता, मूल्ये आणि संवेदनशीलता कायम महत्त्वाची आसल्याचे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी, पुणे आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ई-कंन्टेंट डेव्हल्पमेन्ट अॅण्ड एआय इन इज्युकेशन या पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम बियाणी बोलत होते. कार्यक्रमास शैक्षणिक विकास अधिकारी डॉ. जयप्रकाश दरगड, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. पशांत दिक्षीत व एम.एस.एफ.डी.ए. पुणे यांच्या समन्वयक प्रितम दरेकर उपस्थित होत्या. यंत्र हे मानवाची जागा घेऊ शकत नाही, असे सांगून बियाणी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षण, संशोधन आणि प्रशासनासाठी प्रभावी सहाय्यक ठरू शकते; मात्र मानवी विचारशक्ती, सर्जनशीलता, नैतिक मूल्ये आणि निर्णयक्षमता यांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही, ते म्हणाले.
यावेळी डॉ. दरगड यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिक्षकांची प्रतिस्पर्धी नसून प्रभावी सहकारी आहेत. सदरील कार्यक्रमात ई-कंटेंट निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अध्यापन आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कबीर खराडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ई-कंटेंट निर्मितीमुळे उच्च शिक्षण अधिक प्रभावी, संवादात्मक आणि भविष्योन्मुख होत आहे. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राजू मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कदअउ समन्वयक डॉ. संतोष पाटील, तसेच विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















