लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हयातील जळकोट व अहमदपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर कामाच्या टप्यानुसार कामाची रक्कम घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग होणे आपेक्षित असते. मात्र सदर रक्कम एकदाच घरकूल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकाने जळकोट व अहमदपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना घरकुल प्रकरणी महिना होत आल्यानंतर तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत.
केंद्र सरकार व राज्य सरकार लातूर जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी विविध योजनेतून घरकूल मंजूर करून जिवन सुखकर होण्यासाठी आधार देते. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना नागरीकांच्यासाठी राबवली जात आहे. तसेच राज्य सरकारच्या वतीने मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकूल योजना, यशवंतराव मुक्त वसाहत योजना राबवली जात आहे. या पाच योजनांच्या माध्यमातून जिल्हयातील ५३ हजार ६०१ लाभार्थ्यांना घरकूल देण्याचे उद्दीष्ट आसून घरकूलासाठी जिल्हाभरातून ४९ हजार १२० अर्ज नागरीकांनी दाखल केले होते. त्यापैकी ४५ हजार २२३ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता खात्यावर वर्ग केला आहे. तसेच ३७ हजार ९०९ लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता वर्ग झाला आहे.
तसेच जिल्हयातील जळकोट व अहमदपूर तालुक्यातील कांही घरकूल लाभार्थ्यांच्या खात्यावर जवळपास घरकूलाचे सर्वच हप्ते काम पूर्ण झाले की नाही हे न पाहता सर्व हप्ते ऑनलाईन वर्ग झाल्याचे समोर येत आहे. सदर रक्कम १ कोटीच्या जवळपास असल्याने ही रक्कम परत घेण्याची मोहिम दिपावलीच्या पासून सुरू झाली असून या प्रकरणी ७० ते ८० टक्के रक्कम परतही घेण्यात आल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासन मात्र सुरूवातीला तोंडी सुचना देते. या प्रकरणाची वाच्यता झाली की लेखी सुचना काढून जळकोट व अहमदपूरच्या गटविकास अधिका-यांना तात्काळ अहवाल सादर करा, असे सांगते. घटना घडून महिण्याच्या जवळपास कालावधी होत आहे.
















