27.7 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार

धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार

 करुणा मुंडेंच्या पोस्टवर राष्ट्रवादीचे खासदार म्हणाले ‘देर है अंधेर नही’

बीड : प्रतिनिधी
तीन महिन्यांनंतरही राज्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकारण व्यापलेले आहे. हत्येच्या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. करुणा शर्मा-मुंडे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे मुंडेंचा राजीनामा सोमवारपर्यंत होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ‘देर है, पर अंधेर नही!’ असे सूचक वक्तव्य केले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. त्यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ उडाली आहे. ३ मार्च रोजी धनंजय मुंडे राजीनामा देतील, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला हत्येसाठी मदत करणारे, त्यांना फरार होण्यासाठी मदत करणारे, फरार असताना त्यांना सर्व माहिती देणारे पोलिस अधिकारी आणि इतरांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरत आहे. तर या प्रकरणात पहिल्यापासून वाल्मिक कराडच्या अटकेपासून आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आग्रही असलेले खासदार बजरंग सोनवणे यांनी करुणा मुंडे यांच्या पोस्टवर सूचक विधान केले आहे.

‘देर है, पर अंधेर नही’
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, आपण करुणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट वाचली नाही. त्यांचा दावा माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कळला आहे. करुणाताईंना कुठून माहिती मिळाली माहिती नाही. पण खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असेल तर ‘देर है पर अंधेर नही’, असंच म्हणावं लागेल. असे जर झाले असेल तर, त्यांचे स्वागतच असल्याचे ते म्हणाले.

करुणा मुंडेंच्या पोस्टमध्ये काय?
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे उद्या, ३ मार्च २०२५ रोजी राजीनामा देतील असा दावा करणारी पोस्ट फेसबुकवर केली आहे. तर याच पोस्टमध्ये अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेतल्याचा दावा केला आहे. याविषयी अद्याप राष्ट्रवादीकडून (अजित पवार) अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र करुणा मुंडे यांच्या या पोस्टमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR