लातूर : एजाज शेख
अरुणाचल प्रदेश(एआरएनएल) व मध्यप्रदेश येथून पासिंग करुन आलेल्या २ बाय २ चे १२५ खाजगी ट्रव्हल्स लातूर जिल्ह्यात चालतात. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या ट्रव्हल्स तितक्याश्या सक्षम नसतानाही लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ब-यापैकी रक्कम या ट्रव्हल्सना लातूर जिल्ह्यात चालविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यात खुप मोठी आर्थिक उलाढाल असून प्रवाशांची सुरक्षा मात्र वा-यावर सोडून देण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेश येथील पासिंगच्या(एआरएनएल) १०० तर मध्यप्रदेश येथील पासिंगच्या २५ खाजगी ट्रॅव्हल्स लातूर जिल्ह्यात चालतात. विशेष म्हणाजे या परप्रांतीय ट्रॅव्हलसना महराष्ट्रात बंदी असतानाही या ट्रॅव्हल्स लातूर जिल्ह्यात राजरोसपणे चालतात. यातील महत्वाची बाब म्हणाजे महाराष्ट्रात पासिंग झालेल्या ट्रॅव्हल्सला वार्षिक ३ लाख ६० हजार रुपये टॅक्स भरावा लागतो. परंतू, अरुणाचल प्रदेशमध्ये वार्षिक टॅक्स केवळी ६० हजार रुपये तर मध्यप्रदेशमध्ये वार्षिक टॅक्स ९० हजार रुपये आहे. केवळ महाराष्ट्राचा टॅक्स बुडविण्यासाठी २ बाय २ च्या खाजगी ट्रॅव्हल्स अरुणाचल प्रदेश व मध्यप्रदेशातून पासिंग करुन लातूर जिल्ह्यात चालविल्या जात आहेत.
या ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सक्षम नसतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केवळ चार पैशांसाठी प्रवाशांच्या जीवाशी गाडी मालक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय खेळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात २ बाय २ खाजगी ट्रॅव्हल्सला बंदी आहे. त्यामुळे अशा गाड्यांची महाराष्ट्रात पासिंग होत नाही. त्यामुळे परप्रांतांतून अशा गाड्यांची पासिंग करुन घेतली जाते आणि आर्थिक देवाण-घेवाण करुन या गाड्या महाराष्ट्रात चालविल्या जातात. खरेतर महाराष्ट्रात पासिंग होणा-या गाड्या आणि परप्रांतात पासिंग करुन आलेल्या गाड्यांमध्ये खुप मोठी तफावतदेखील आहे.
टॅक्स कमी असलेल्या परप्रांतात पासिंग झालेल्या २ बाय २ च्या ट्रॅव्हल ३८ सीटर आहेत तर सर्वाधिक टॅक्स असलेल्या महाराष्ट्रात पासिंग झालेल्या २ बाय १ ट्रॅव्हल्स ३६ सीटर आहेत. महाराष्ट्रातील टॅव्हल्स कमी सीटर अधिक टॅक्स तर परप्रांतीय ट्रॅव्हल्स अधिक सीटर कमी टॅक्स असलेल्या आहेत. या खुप मोठी आर्थिक उलाढाल असून परप्रांतात पासिंग झालेल्या व महाराष्ट्रात बंदी असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स लातूर जिल्ह्यात चालतातच कशा?, असा प्रश्न समोर येत आहे.
















