पुणे : प्रतिनिधी
दिवाळी सणाचा उत्साह घराघरांत पोहोचला आहे. या उत्सवाला दिवाळीच्या सणात घराघरांत सजावटीसाठी फुलांची सजावट करण्यात येत असते. यामुळे फुलांना मोठी मागणी असते. मात्र यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुल शेतीचे नुकसान झाले असून आता या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या कष्टावर पाणी फिरले. हतबल झालेल्या शेतक-यांनी रस्त्यावर फुलं फेकून दिली असून ही फुलं उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड पाहण्यास मिळत आहे.
दिवाळीच्या सणात प्रत्येक घर सुगंधी फुलांनी सजवण्याची प्रथा आहे. त्यामुळे झेंडू, शेवंती, गंधराज, गुलाब या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. पुणे, शिरूर, खेड परिसरातील शेतक-यांनी पहाटेपासूनच फुलतोड सुरू केली असून थेट फुलबाजारात पोहोचवण्यासाठी गाड्यांची लगबग सुरू असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे दिवाळीच्या दिवसांत फुलांचा सुगंध केवळ देवघरातच नाही तर शेतक-यांच्या घरातही आनंदाचा दरवळ घेऊन येतो. मात्र यंदा चित्र उलट दिसून येत आहे.
दिवाळीच्या सजावटीसाठी मेहनतीने पिकवलेली झेंडूची फुलं शेतकरी बाजारात घेऊन गेले, पण भाव न मिळाल्याने त्यांची निराशा वाढली. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतक-यांनी थेट रस्त्यावर फुलं फेकण्याचा निर्णय घेतला. निराश झालेल्या शेतक-यांनी फुलं पुणे-आहिल्यानगर महामार्गावर सणसवाडी येथे रस्त्यावर फेकून दिली. अर्थात यात मोठे नुकसान शेतक-याचे होत आहे.
फेकलेली फुलं उचलण्यासाठी झुंबड
बाजारात विक्री करणा-यांकडून फुले विकत न घेता फेकलेली फुलं फुकट मिळत असल्याचे समजताच नागरिकांनी ती उचलण्यासाठी झुंबड उडवली. दरम्यान शेतक-यांच्या कष्टाचं सोनं व्हावं ही अपेक्षा असताना, त्यांच्या घामाने पिकलेली फुलं रस्त्यावर पडलेली पाहून नागरिक याच फुलांच्या पिशव्या भरून घेऊन जात आहेत.
















