लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकरराव एकुर्केकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाच्या प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनेतील दीर्घ अनुभव, सामाजिक प्रश्नांबाबतची तळमळ आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे लातूर जिल्ह्यासह राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना एकुर्केकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मागासवर्गीय समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, संघटन विस्तारासाठी आणि पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय विभाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल माजी समाजकल्याण सभापती मधुकरराव एकुर्केकर यांचे मान्यवरांकडून सहकार महर्षि दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख, प्रदेश सचिव कल्याण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळूंके, लातूर शहराध्यक्ष डॉ. शिवाजीराव जवळगेकर, तालुकाध्यक्ष संतोष बिरादार, प्रीती भोसले, मंजूरखां पठाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कौतुक केले आहे.















