नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून तेथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाच्या अनेक आमदार, खासदारांनी भाजपाची वाट धरली. खासदारांनी वेगळा गट स्थापन करून तिस-याच पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या मोठ्या गटानेही आपली वेगळी चूल मांडली. या मोठ्या धक्क्यातून सावरून ममता बॅनर्जी आपल्या पक्षात नव्याने प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच आता ममता बॅनर्जींना भारतीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत तृणमूल काँग्रेसचे नाव तसेच निवडणूक चिन्ह गोठवले आहे.
पोटनिवडणुकीत दोन्ही गट या नावाचा आणि चिन्हाचा वापर करू शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांचा गट आणि ऋतब्रत बॅनर्जी गटाला नवे नाव आणि चिन्ह देण्यास सांगितले आहे. दोन्ही गटांनी ३-३ पर्याय द्यावेत, असे आयोगाने कळवले आहे. दोन्ही गटांना उद्या ११ वाजेपर्यंत नावे आणि चिन्ह द्यावे लागतील.
















