लातूर : प्रतिनिधी
लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई रोडवरील मयुरा लॉजमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड टाकून १२ जुगा-यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल, जुगाराचे पत्ते असा ३ लाख ६३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मयुरा लॉज, अंबेजोगाई रोड, लातूर येथील तिस-या मजल्यावरील रूम क्रमांक ३०६ मध्ये रात्री काही इसम मोठ्या प्रमाणात तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. सदरची माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळवून परवानगीने दि. २२ जुलै रोजी रात्री १०.५० वाजता छापा टाकण्यात आला. छाप्यावेळी १२ जण दोन वेगवेगळ्या रिंगणात बसून पैशांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल तसेच जुगाराचे पत्ते असा ३ लाख ६३ हजार ५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत शिवा सदाशिव छत्रबन (वय ४१, रा. क्रांती नगर, खाडगाव रोड, लातूर), जमीर महेबूब शेख (वय ३८, रा. खाडगाव रोड, लातूर), संजू संदीपान बनसोडे (वय ४७, रा. गोपाळ नगर, लातूर), सचिन दयाराम सूर्यवंशी (वय ४२, रा. सिद्धेश्वर नगर, लातूर), संगमेश्वर सुभाषराव राचटे (वय ४३, रा. कारंजे गल्ली, औसा, जि. लातूर), आबेर बाबासाब शेख (वय २७, रा लातूर), समीर अब्दुल रहेमान कलाल (वय २९ वर्षे), रा. मैसूर कॉलनी, लातूर), भिमराव रामजी सोनकांबळे (वय ३९,
तडखेल, ता. देगलूर, जि. नांदेड), सोहेल रफिक सय्यद (वय २७, रा. शाम नगर, लातूर), पुष्पसिल धर्मराज सिरसाट (वय ४२, रा. प्रकाश नगर, लातूर ), राहुल पंडित इंगावले (वय ३७, रा. समसापूर, ता. रेणापूर, जि. लातूर), सुनिल लक्ष्मण वाघमारे (वय २८, रा. शिवनगर, जि. नांदेड) या १२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सॅमसंग फोल्ड-६, वनप्लस, विवो, रेडमी, ओप्पो, टेक्नो आदी कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस पोलीस ठाणे शिवाजीनगर, लातूर येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















