27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeहिंगोलीमुंबईत माझ्याविरोधात ‘स्टिंग ऑपरेशन’चा कट रचला जातोय

मुंबईत माझ्याविरोधात ‘स्टिंग ऑपरेशन’चा कट रचला जातोय

हिंगोली : माझ्या विरोधात कट रचला जातोय, कारण काय तर मी गरिबांसाठी काम करतोय. मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन सुरू आहे, असा खळबळजनक दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. हिंगोलीच्या कामठा फाटा येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हा आरोप केला आहे. मात्र आपणही काही कमी नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता इशाराही दिला आहे. मात्र मनोज जरांगे यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

येत्या चार ते पाच दिवसांमध्ये फार मोठा कट हा मुंबई येथे रचला जातोय, त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. तेथे तर ‘स्टिंग ऑपरेशन’ सुरू आहे. मात्र आपणही काही कमी नाही, आपली देखील यंत्रणा कामाला लागली आहे. कट का रचला जातोय? तर मी फक्त गरिबांच्या लेकरांसाठी काम करतोय म्हणून. मात्र आपल्याला काही फरक पडत नसल्याचे सांगत मनोज जरांगे यांनीही इशारा दिला आहे. हिंगोलीच्या कामठा फाटा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

परभणीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बाधित शेतकरी उपोषणाला बसले आहेत. याच शेतक-यांची मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच भेट घेतली आणि शेतक-यांशी चर्चा केली. आपले म्हणणे सरकार दरबारी मांडले पाहिजे, असेही मनोज जरांगे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आणि शेतक-यांचे महसूलमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, जर पवार कुटुंबीयांचे म्हणणे असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सध्या काम करताना जशी माहिती दिली जात आहे, त्याप्रमाणे आता सर्वांनाच वाटत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, परिवाराचे म्हणणे असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR