औराद पोलिस ठाण्यासमोर सुरू होते ठिय्या आंदोलन, कॉंग्रेस नेते, पदाधिकारी आक्रमक
मतदार पळवापळवीच्या आरोपाने राजकारण तापले
निलंगा : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मतदानाच्या राजकारणातून मतदारांच्या पळवापळवीचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. औराद शहाजानी परिसरातून ४ मतदारांसह ५ जणांचे अपहरण झाल्याची बाब समोर येताच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, कॉंग्रेस नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी औराद शहाजानी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आजही अपहरणाची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या सुरूच होता. अखेर या आंदोलनाला यश आले असून, औराद पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा बाळू शिंगाडे आणि आणखी एकाविरुद्ध अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला.
तत्पूर्वी, निलंगा तालुक्यातील मुगाव येथील एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या वडिलांना जबरदस्तीने वाहनात बसवून घेऊन गेल्याची तक्रार औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते, पदाधिका-यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले.
सृष्टी कमलाकर शिंदे या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे वडील कमलाकर गोविंदराव शिंदे हे विविध कार्यकारी सहकारी संस्थेशी संबंधित असून संस्थेचे चेअरमन आहेत. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ते मित्रांसोबत कर्नाटकातील मैलार येथे देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास वडिलांना काही जणांनी घेऊन गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. आज सकाळी नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमलाकर शिंदे आणि त्यांच्या मित्रांना औराद शहाजानीजवळील दत्त मंदिर परिसरातून जबरदस्तीने वाहनात बसवून नेण्यात आल्याचे समजल्याचे सृष्टीने तक्रारीत नमूद केले. माझे वडील कुठे आहेत, त्यांना कोण घेऊन गेले, त्यांचा गुन्हा काय, असे सवाल उपस्थित करीत सृष्टीने आपल्या वडिलांचा शोध घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले.
दरम्यान, या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी समर्थकांसह औराद शहाजानी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलिस ठाण्यातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर रात्री उशिरा विनोद राजेंद्र वीर यांच्या फिर्यादीवरून बाळू शिंगाडे आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरण व जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मतदारांच्या शोधासाठी २ पोलिस पथके रवाना
निलंगा उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे पाटील हे या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. औराद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत बांगर, निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे, तसेच कासार शिरसी व देवणी येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांची कुमक दिवसभर औराद येथे तैनात होती. संबंधित मतदारांचा शोध घेण्यासाठी २ पोलिस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे पाटील यांनी दिली.
पोलिस ठाण्यासमोर गर्दी
या आंदोलनात तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, पंकज शेळके, मोहनराव भंडारे, हाजी सराफ, गोरख नवाडे, अजित नाईकवाडे, उमाकांत जाधव, हमीद शेख, प्रा गजेंद्र तरंगे, बाबूराव भंडारे, महेश देशमुख, रमेश मदरसे, सिराज देशमुख, मदन बिरादार, विलास कांबळे यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला होता.
काँग्रेसचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा, औसा परिसरात ८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. मतदारांना धमकावणे, दबाव आणणे तसेच मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे प्रकार रोखून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा सहकार पॅनलला पाठिंबा
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून ४० वर्षांच्या जिल्हा बँकेच्या वैभवशाली इतिहासाला जपण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कोअर कमिटीचे सदस्य राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी यांनी पाठिंबा दिला आहे. शेतक-यांनी व मतदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा बँकेच्या विकासासाठी सहकार पॅनलच्या ‘शिट्टी’ या चिन्हावर मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बाळू शिंगाडेसह एकाविरुद्ध अपहरण,
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच निवडणुकीच्या कारणावरून ५ जणांना बळजबरीने कारमध्ये बसवून पळवून नेल्याची फिर्याद औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून माजी नगराध्यक्ष बाळू शिंगाडे व आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी औराद शहाजानीपासून दक्षिणेकडे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पुलाजवळ अपहरणाची घटना घडली. फिर्यादी विनोद राजेंद्र वीर (३८, रा. भडी, ता. जि. लातूर) हे व अन्य ४ व्यक्तींसह जात असताना आरोपींनी त्यांची गाडी थांबविली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या कारणावरून संगनमत करून पाचही जणांना बळजबरीने कारमध्ये बसविले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे अपहरण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावरून औराद शहाजानी पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री १० वाजून २१ मिनिटांनी कलम १४०(३), ३५१(२), ३५१(३) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
















