नाशिक : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटील आणि इतर आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमधील सातपूर येथील उद्योजक कैलास अहिरे यांची १० कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलिस पुढील तपास करत आहेत. कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात हा गुन्हा दाखल झाला. कैलास अहिरे हे भाजपचेच नाशिक येथील पदाधिकारी आहेत.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास अहिरे हे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सातपूर एमआयडीसीमध्ये त्यांची एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रा. लि. कंपनी आहे. एका कार्यक्रमात रावासाहेब दानवे आणि त्यांची भेट झाली. कंपनीवर कर्ज असून पैशांची निकड असल्याचे अहिरे यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी रावसाहेब दानवे हे नाशिकला आले आणि त्यांनी प्रकल्प पाहिले. त्यावेळी त्यांनी सेटलमेंट करून देण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात कंपनीत १४ टक्के शेअर देण्याची अट ठेवली. त्यानुसार, २५ कोटींचे शेअर्स पवार यांना देण्याचा व्यवहार ठरला. हा व्यवहार झाल्यावर दानवे पुन्हा एकदा नाशिकला आले. अहिरे यांना सुरुवातीला १४ कोटी ३४ लाख ९८ हजार रुपये देण्यात आले. पण उर्वरित रक्कम देण्यात आली नाही.
त्याविषयी वारंवार संपर्क करूनही टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप अहिरे यांनी केला. तर दुसरीकडे कंपनीचे शेअर्स परस्पर दुस-या व्यक्तीला वर्ग करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
















