नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हेडिंग्ले कसोटीत शानदार शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी कारण त्याची फलंदाजी नव्हे, तर त्याचे काळ्या रंगाचे मोजे बनले आहेत. खरंतर, इंग्लंडविरुद्ध सामन्याच्या पहिल्या दिवशी गिल काळे मोजे घालून फलंदाजीसाठी मैदानात उतरला, जे आयसीसीच्या ड्रेस कोडच्या नियमांचे उल्लंघन मानलं जातं.
कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखाबाबत आयसीसीचे कडक नियम आहेत. आयसीसीच्या नियमानुसार, खेळाडूंनी सामन्यादरम्यान फक्त पांढरे, क्रीम रंगाचे किंवा हलक्या राखाडी रंगाचे मोजेच घालणे बंधनकारक आहे. एमसीसीच्या नियम १९.४५ अंतर्गत हे स्पष्टपणे नमूद आहे की या रंगांखेरीज गडद रंगाचे मोजे घालण्याची परवानगी नाही. हा नियम २०२३ मध्ये लागू करण्यात आला होता आणि तेव्हापासून बहुतेक सर्व खेळाडू या नियमाचं पालन करत आहेत.
मात्र, हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल कॅमे-याच्या नजरांपासून वाचू शकला नाही. तो काळ्या रंगाचे मोजे घालून फलंदाजी करताना दिसून आला, ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि प्रश्न उपस्थित झाले की हे नियमांचं उल्लंघन आहे का? आणि जर आहे, तर यावर कारवाई होईल का?
या प्रकरणात अंतिम निर्णय सामना पंच रिची रिचर्डसन घेतील. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशा प्रकारचा ड्रेस कोड उल्लंघन ‘लेव्हल १’ चा गुन्हा मानला जातो. यामध्ये खेळाडूवर १० टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत मॅच फीचा दंड आकारला जाऊ शकतो आणि खेळाडूला डिमेरिट पॉईंट्सही दिले जाऊ शकतात.
मात्र, जर सामना पंचांना असं वाटलं की गिलने ही चूक जाणूनबुजून केलेली नाही, तर त्याला केवळ इशारा देऊन सोडलं जाऊ शकतं. सर्वसाधारणपणे क्रिकेटमध्ये ड्रेस कोडच्या उल्लंघनाबाबत कठोर शिक्षा फार कमी वेळा पाहायला मिळते, पण यावेळी हे उल्लंघन स्वत: कसोटी संघाचा कर्णधार करत असल्यामुळे सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे.
शानदार फलंदाजी, पण ड्रेस कोडवरून चर्चा
हे विशेष लक्षात घेण्यासारखं आहे की, एका बाजूला शुभमन गिलने नाबाद १२७ धावांची शानदार खेळी करत भारताला भक्कम स्थितीत पोहोचवलं, तर दुस-या बाजूला त्याच्या ड्रेसमधील या छोट्याशा चुकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या दिवसाखेर भारताने ३५९/३ धावा केल्या आहेत आणि गिल दुस-या दिवशी आपली खेळी पुढे सुरू ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.