लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थीनींना शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने मोफत पास योजना अमलात आणण्यात येत आहे. या योजनेचा लाभ लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ९ हजार ६४४ विद्यार्थीनींनी घेतला आहे. एमटी महामंडळाच्या या योजनेचा ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शिक्षणासाठी चांगला फायदा होत आहे.
लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या सजग आणि प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही शैक्षणिक वातावरण आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थीनींना शहरी भागातील शाळा, महाविद्यालयात जाता यावे, याकरीता एसटी महामंडळाने मोफत पासची योजना सुरु केलेली आहे. याचा चांगला फायदा विद्यार्थीनींना होतो आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ९ हजार ६४४ विद्यार्थीनी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यात सर्वाधिक मोफत पास हे निलंगा आगारातून २ हजार ६१७ विद्यार्थीनींनी देण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर आगारातून २ हजार ३५ आणि लातूर आगारातून १ हजार ८९४ विद्यार्थीनींनी या योजनेतून मोफत प्रवास पास काढला आहे. उदगीर आगारातून १ हजार २०८, औसा आगारातून १ हजार ८९० असे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील पाच आगारांतून एकुण ९ हजार ६४४ विद्यार्थीनींनी एसटीच्या मोफत पासचा लाभ घेतला आहे.
ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थीनी शाळा, महाविद्यालयात ये-जा करता. या विद्यार्थीनींनसाठी मोफत पास योजना सुुरु करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थीनींनी या योजनेमुळे शाळेत, महाविद्यालयात जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी एसटी पाससाठी महिन्याला पैसे मोजावे लागत होते. मात्र, काही दिवसांपासून विद्यार्थीनींना या मोफत पासची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थीनींच्या शिक्षणाची सोय झाली आहे.