नाशिक : प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियातून हटवण्यात येत आहेत. एसआयटीच्या सायबर टीमने तब्बल चार हजारपेक्षा अधिक लिंक्स सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत.
मात्र, त्यापूर्वी या अशोक खरात पीडित महिलांच्या आक्षेपार्ह व्हीडीओची विक्री अवघ्या १५ ते २० रुपयांमध्ये केली जात असल्याचे उघड झाले आहे. १५ ते १७ अश्लील व्हीडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर व्हायरल करण्यात आले होते. काही साईटवर हे व्हीडीओ पाहण्यासाठी १५ ते ५० रुपये आकारले जात होते.
या व्हीडीओंमुळे पीडित महिलांची ओळख उघड झाली असून त्यांना मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे. आठ ते नऊ महिला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देखील घेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, व्हीडीओ व्हायरल करणा-यांच्या विरोधात सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारित करण्यावर सायबर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर असे महिलांचे व्हीडीओ व्हायरल केले, शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

