पुणे : सुप्रसिद्ध विधिज्ञ वकील असीम सरोदे यांना त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांच्याबाबत केलेले विधान आता भोवले आहे. कारण त्यांनी संविधानिक पदावर बसलेल्या दोन व्यक्तींबाबत केलेल्या विधानामुळे त्यांची वकिलीच सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी (ता. ३ नोव्हेंबर) हा निर्णय घेतला. ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिलेले आहेत. असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
वकील असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे सरोदेंनी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने केली होती.
असीम सरोदेंचे वक्तव्य अशोभनीय, गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचे नमूद करून बार कौन्सिलकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने १९ मार्च २०२४ रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली, पण त्यांनी ती नाकारली. त्यामुळे आता त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या तक्रारीनंतर वकील विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप पाहिल्या होत्या. ज्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वकील विवेकानंद घाटगे यांनी पाहिलेल्या व्हिडीओमध्ये वकील असीम सरोदे हे राज्यपाल फालतू आहेत व न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे, असे स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होत आहे. न्यायव्यवस्था आणि संविधानिक पदे यांचा आदर राखणे ही वकिलाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. वकील हा “Officer of the Court”असल्याने त्याने न्यायसंस्थेविषयी संयम आणि सन्मान राखला पाहिजे, असे बार कौन्सिलच्या समितीने म्हटले. पण या कारवाईनंतर सरोदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
















