लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकर आणि डॉ. शिरुरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या ‘आरसीसी’ क्लासेसवर बंदी घालावी, तसेच डॉ. शिरुरे यांचे रुग्णालय सील करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ‘नीट’ प्रकरणातील सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या मागण्यांसाठी सतीश कारंडे यांच्यासह चळवळीतील सहकारी आणि विद्यार्थ्यांनी रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून लातूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणा-यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शासनावरील विश्वास आणखी ढासळेल, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
















