परभणी : शहरातील विद्यानिकेतन शिक्षण संस्था संचलित पारदेश्वर विद्यामंदिर येथे गेल्या १८ वर्षांपासून आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदी संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत केली.
आषाढी एकादशी निमित्त शाळांमध्ये अभंग गायन, भजन, दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक, हरिपाठ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून आषाढी एकादशीचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगत संतांच्या विचारांचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमांमुळे शाळांमध्ये भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यानिकेतन संस्थापक सचिव अॅड. रावसाहेब देशमुख, सुशील जोजारे, शिवाजीराव वाघमारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
















