वाशिम : प्रतिनिधी
जिल्ह्यातील राजुरा गावात सध्या एका आश्चर्यकारक घटनेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गावात असलेल्या तब्बल १२ वर्षे जुन्या बोअरवेलमधून गेल्या २० ते २५ दिवसांपासून सातत्याने गरम पाणी बाहेर येत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोअरवेल साधारण १२ वर्षे जुनी असून, आजवर यातून अत्यंत सामान्य आणि पिण्यायोग्य पाणी येत होते. मात्र, गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून या बोअरवेलच्या पाण्याच्या तापमानात अचानक मोठी वाढ झाली असून, त्यातून चक्क गरम पाणी उपसले जात आहे. हा प्रकार परिसरातील नागरिकांसाठी एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. दररोज आजूबाजूचे लोक हे गरम पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
पाणी पिण्यास अयोग्य
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने आणि संबंधित विभागाने तत्काळ या गावाला भेट देऊन बोअरवेलच्या पाण्याची प्राथमिक तपासणी केली. या प्राथमिक तपासणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या गरम पाण्यात विविध रसायनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, हे पाणी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि पिण्यास पूर्णपणे अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बोअरवेलमधून अचानक गरम पाणी का येत आहे? भूगर्भात एखादी उष्णतेची लाट किंवा रासायनिक प्रक्रिया घडत आहे का? याचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या बोअरवेलच्या पाण्याचे नमुने गोळा करून ते सविस्तर आणि उच्चस्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
















