28.4 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरउमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे करावे

उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे करावे

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक पारदर्शक, शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. प्रत्येक बाबीसाठी विहित कालावधीत पूर्वपरवानगी घेवूनच प्रचार मोहीम राबवावी, असे निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार यांनी सांगितले. तसेच उमेदवारांकडून होणारा प्रत्येक खर्च नोंदवहीत नमूद करावा, असे निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांबाबत माहिती देण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवडणूक संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, आदर्श आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी जावेद शेख यावेळी उपस्थित होते.
प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवाराने भडकावू, तेढ निर्माण करणारी भाषणे करू नयेत. तसेच व्यक्तिगत टीका टाळावी. प्रचारासाठी वाहने आणि इतर बाबींची पूर्वपरवानगी घ्यावी. प्रचाराचा कालावधी, ध्वनिक्षेपक वापराची वेळ सर्वांनी पाळावी. सर्व उमेदवारांनी मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांची नियुक्ती करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. मतदानादिवशी मतदान सुरु होण्यापूर्वी ९० मिनिटे अगोदर मॉक पोल घेण्यात येणार आहे.
यावेळी सर्व उमेदवारांनी आपले प्रतिनिधी उपस्थित ठेवावेत. तसेच मतदान यंत्रांचे दुसरे सरमिसळीकरण झाल्यावर मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची यादी सर्व उमेदवारांना देण्यात येणार असून त्याप्रमाणे मतदान यंत्राची मतदान केंद्रावर पडताळणी करावी. गृह मतदानात गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असून उमेवरांनीही यामध्ये सहकार्य करावे, असे निवडणूक सामान्य निरीक्षक निरंजन कुमार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR