बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटक काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांतील वाद काही लपलेले नाहीत. शिवकुमार यांच्या गटानुसार, २०२२ मध्ये राज्यात काँग्रेस बहुमताने निवडून आली. त्यावेळी मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे दोन्ही नेत्यांकडे देण्याचे ठरले होते. म्हणजे सुरुवातीला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या असतील तर पुढील अडीच वर्षे हे पद शिवकुमार यांच्याकडे असेल. आता अडीच वर्षांचा हा कालावधी या महिन्यातच संपणार आहे. त्यामुळे डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात यावे. मात्र सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी असे काही ठरलेले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री पद सोडण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा केला आहे.
बिहार निवडणूक निकाल लागून २४ तासही उलटले नाही तोच सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघे शनिवारी दिल्लीत डेरेदाखल झाले. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ही भेट अवघी १५ ते २० मिनिटं चालली. कर्नाटकचे दोन्ही प्रभावशाली नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या पुस्तकाच्या विमोचनालाही हजर राहिले.
कर्नाटकातील काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमध्ये दिल्ली दौरा करणार असल्याचे आणि त्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी चर्चा करणार असल्याचा दावा केला होता. मंत्रिमंडळ फेरबदलाआड कोण कुणाचा पत्ता कापणार ही चर्चा कर्नाटकमध्ये रंगली आहे.

