31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावरून रंगले राजकारण

काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावरून रंगले राजकारण

सत्ताधारी नेत्यांची तुफान फटकेबाजी

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याची नेहमीच चर्चा रंगत असते. आज देखील शरद पवार यांच्या सूचक वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. आगामी काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा आशयाचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर मंत्री छगन भुजबळ आणि संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार हे यापूर्वीच काँंग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट देखील निरुपम यांनी केला आहे.

नाशिकचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली. या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असताना झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का, असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, प्रादेशिक पक्ष विलीन होतील असे मला वाटत नाही. काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी आपल्या ताकदीवर सरकार बनवलेले आहे. पवार साहेब बोलतात त्याचा अर्थ प्रत्येक जण वेगवेगळा काढतो. बारामतीची निवडणूक संपल्यामुळे कलगीतुरा थांबेल. बारामतीची निवडणूक संपली याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट
त्यानंतर एकनाथ शिांदे गटातील नेते संजय निरुपम यांनी देखील ट्वीट करत शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली. त्याचबरोबर याआधी देखील याबाबत बोलणी झाल्याचे आरोप देखील निरुपम यांनी केला. संजय निरुपम म्हणाले, ‘‘आदरणीय शरद पवारजी अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता. मात्र मुलीबाबत समस्या होती. त्यांनी आपल्या मुलीकडे महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली. आता त्यांचा पक्ष विखुरला गेला आहे. त्यांच्या आत्ताच्या विधानाचा अर्थ असा आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, कदाचित त्यांना तशी भीती वाटते. तसे झाले नाही तरी काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.’ अशी घणाघाती टीका संजय निरुपम यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR