33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात सत्ता कुणाची?; ४ जूनला लागणार निकाल

कोल्हापुरात सत्ता कुणाची?; ४ जूनला लागणार निकाल

कोल्हापूर : डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मतदानाची एकूण ७०.३५ टक्के इतकी आकडेवारी समोर आली आहे. गत निवडणूक सन २०१९ पेक्षा साधारण ५ ते ७ टक्के मतांची टक्केवारी जास्त झाली आहे. त्याचबरोबर २०१९ पेक्षा यावेळी मतदारसंख्या सुद्धा लाखापेक्षा जास्त वाढली आहे. जास्त झालेले मतदान कोणाला तारणार हे ४ जूनला समजणार आहे. एका बाजूला गेल्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात झालेली घट चिंतेचा विषय ठरत असताना कोल्हापुरात मात्र तिस-या टप्प्यात डोक्यावर ४० अंश सेल्सिअस तापमान असतानाही सर्वाधिक सरासरी ७०.३५ टक्के मतदान करत कोल्हापूरकरांनी उमेदवारांचा विषय हार्ड करून टाकला आहे. वेळ संपली तरी सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

कोल्हापुरात मोठ्या संख्येने पार पडलेले मतदान हे नेमके कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार त्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर उमेदवार शोधापासून ते जुळण्या लावेपर्यंत महाविकास आघाडीला मोठी मेहनत घ्यावी लागली. तर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या नेत्यांची इन्कमिंग झाल्याने जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.

मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात काँग्रेस आणि शरद पवार यांनी मोठी खेळी खेळत ही जागा काँग्रेसकडे घेऊन थेट छत्रपती घराण्यातील शाहू महाराज यांना निवडणूक रिंगणात उतरवले. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. दोघांकडून देखील जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबविण्यात आल्या. मात्र, कोल्हापुरात शाहू महाराज आणि छत्रपती घराणा यांचा मोठा आधार असल्याने विरोधकांना थेट शाहू महाराजांवर टीका करणे अवघड होऊ लागले. अशातच छत्रपती घराण्यावर वैयक्तिक पातळीवर टीका अनेक मतदारांना रुचलेली दिसत नव्हती. यामुळे याचा परिणाम थेट मतदाना दिवशी देखील पाहायला मिळत होता. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये संजय मंडलिक यांना निवडून आणण्यात सतेज पाटील यांचा मोठा वाटा होता. तसेच, सतेज पाटील यंदा मात्र शाहू महाराज यांच्यासोबत होते. तसेच, शाहू महाराजांसोबत संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, आमदार जयंत पाटील, आमदार पी. एन. पाटील, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशी मोठी फळी त्यांच्या बाजूने होती. यामुळे मायक्रो लेव्हलला जाऊन सोशल मीडियापासून ते सोशली फिरून ‘डोअर टू डोअर’ महाविकास आघाडीने प्राचार यंत्रणा राबवली. तर, दुस-या बाजूला संजय मंडलिक यांच्यासाठी महायुतीचे खासदार धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार महाडिक, शोमीका महाडिक अशी मोठी फळी मंडलिक यांच्यासाठी दिवस-रात्र राबत होती. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष संजय मंडलिक यांच्यासाठी दिलेले पाहायला मिळाले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी कागलसह राधानगरी आणि चंदगड येथे संजय मंडलिक यांची मोठी ताकद होती. या तालुक्यातील तिन्ही प्रमुख नेते महायुतीचे होते. यामुळे या प्रमुख तीन नेत्यांकडून संजय मंडलिक यांच्यासाठी जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती. मात्र यापैकी करवीर, राधानगरी, कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात काल मतदाना दरम्यान शाहू महाराज छत्रपती यांचा प्रभाव मतदारांवर जाणवत होता. असे असले तरी येथे शेवटच्या दोन दिवसांत महायुतीकडून खेळण्यात आलेले डाव हे देखील चर्चेचे विषय ठरत होते. यामुळे राधानगरी आणि करवीरमधून शाहू महाराज यांना मिळणारी लीड मंडलिक त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कागलमधून आणि पाहुण्यांनी चंदगडमध्ये लावलेली ताकद दोन्ही मिळून तोडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR