कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापुरातील नांदणी येथील जैन मठामधील ‘महादेवी’ हत्तीण अखेर गुजरातमधील मुकेश अंबानींच्या वनतारामध्ये जाण्यासाठी रवाना झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तिणीला निरोप देताना नांदणीकर आणि परिसरातील नागरिकांच्या अश्रूंना अक्षरश: बांध फुटला आहे. महादेवी हत्तीण शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग बनली होती. त्यामुळे तिला निरोप देताना नांदणी मठातील व गावातील लोक भावूक झाले होते. या हत्तिणीला निरोप देण्याच्या आधी ग्रामस्थांनी हत्तिणीची मिरवणूकही काढली
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तिणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यामुळे ही हत्तीण वनताराकडे नेली जाणार आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र हत्तिणीच्या प्रेमापाई व्याकुळ झालेले पाहायला मिळाले. नांदणी इथल्या मठाला जैन धर्मियांच्या श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. या मठात मागील ३३ वर्षांपासून महादेवी नावाच्या हत्तिणीचा सांभाळ करण्यात आला होता, मात्र याच हत्तिणीला गुजरातच्या वनतारा अभयारण्यात नेण्यात येणार आहे. हत्तिणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर नांदणीतील ग्रामस्थांनी दिवसरात्र आंदोलनही केले होते, तसेच, सुप्रीम कोर्टाचे दारही ठोठावले होते, मात्र त्यांना निराशाच मिळाली.
महिलांसह लहान मुलेदेखील भावनिक
स्थानिकांचे म्हणणे आहे की, महादेवी ही केवळ एक हत्तीण नव्हती, तर ती त्यांच्या श्रद्धा, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग होती. तिने अनेक जैन धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला होता आणि श्रद्धेचे प्रतीक बनली होती. सुप्रीम कोर्टाने महादेवी हत्तिणीला कोल्हापुरातील नांदणी गावातून गुजरातमधील अंबानी यांच्या ‘वनतारा’ येथे हलविण्याचा आदेश दिला आहे. यानुसार वनताराच्या टीमने वनविभागाच्या अधिका-यांसह नांदणी मठात जाऊन महादेवीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या वेळी नांदणी मठात हत्तिणीची पूजा करून मिरवणूक काढत निरोप देण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिक, महिला, लहान मुले भावनिक झालेले पाहायला मिळाले.
प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य
महादेवी हत्तिणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ या संस्थेने केला होता. हे प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने हत्तिणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई हायकोर्टाने प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवले होते.
काय होती परंपरा?
नांदणी येथील जैन मठ हा महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील ७४८ गावांतील जैनधर्मीयांसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. मठाला सुमारे १,२०० वर्षांचा इतिहास आहे. अनेक दशकांपासून मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे. मठाच्या अखत्यारीतील गावांमध्ये होणा-या महोत्सवात या हत्तिणीला विशेष मान असतो. पूजेतील इंद्र-इंद्राणींना हत्तीवरून मिरवणुकीने भगवंतांच्या अभिषेक स्थळी नेले जाते, जो परंपरेचा एक भाग मानला जातो.