पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील रेडिसन ब्लू हॉटेलच्या बाजूला एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये दोन महिला आणि पाच पुरुष रेव्ह पार्टी करताना आढळले. यातील प्रांजल खेवलकर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. प्रांजल खेवलकर हे शरद पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. रविवारी त्यांना सुटीच्या कोर्टात हजर करण्यात आले, तिथे त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, प्रांजल खेवलकर यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल समोर आला त्यामध्ये त्यांनी मद्य प्राशन केल्याचे समोर आले. या संबंधित एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकरवर नजर ठेवून होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी आयोजित या पत्रकार परिषदेत तीन पोलिस साध्या वेशात पत्रकार असल्याचे भासवून घुसल्याचा आरोपही खडसेंनी केला आहे. यामुळे एकनाथ खडसे यांच्यावही पोलिस लक्ष ठेवून आहेत का, खडसेही पोलिसांच्या रडारवर आहेत का, असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
एकनाथ खडसेंवर पाळत?
एकनाथ खडसे म्हणाले की, माझी पत्रकार परिषद सुरू असताना सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले तीन पोलिस पत्रकार परिषदेत घुसले. आताही माझ्या घराबाहेर पोलिस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा राज्यातील सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत ठेवली जात आहे का? असेही एकनाथ खडसे म्हणाले.