26.4 C
Latur
Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रगळफास घेतल्याने डॉक्टर महिलेचा मृत्यू

गळफास घेतल्याने डॉक्टर महिलेचा मृत्यू

सातारा प्रकरणात पोस्टमार्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती

सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या डॉक्टर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनाच्या अहवालात नेमकी कोणती माहिती समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आता हा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला आहे. विशेष बाब म्हणजे या डॉक्टर महिलेच्या शरीरावर अन्यत्र कुठेही जखमा नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवालही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर महिलेचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाला आहे. सोबतच तिच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. हाच शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.
दुसरीकडे पीएसआय बदने, पोलिस कर्मचारी बनकर तसेच मृत डॉक्टर यांचे सीडीआर पोलिसांच्या हाती आले आहेत.

याच सीडीआरचा आता तपास केला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून मृत डॉक्टरचे बदने तसेच बनकर या दोघांसोबतही फोन कॉल झालेले आहेत. त्यामुळे डॉक्टर महिलेचे दोघांशी नेमके कोणत्या विषयावर बोलणे व्हायचे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी बदनेने पोलिसांना त्याचा फोन दिलेला नाही. बदनेच्या फोनचा तपास सुरू आहे. माझे डॉक्टर महिलेसोबत मैत्रीशिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नसल्याचे बदने पोलिसांना सांगत आहे. त्यामुळे महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचे गूढ जास्तच वाढले आहे.

महिला डॉक्टर प्रकरणी राजकारण तापले
दरम्यान, सातारा घटनेचे राजकीय पडसादही उमटत आहेत. या प्रकरणाचा भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी लावला जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा निंबाळकरांशी कोणताही संबंध नाही, असे सांगत त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. तर दुसरीकडे डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा खून करण्यात आला आहे, याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR