परभणी : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडलेल्या गोवंश चोरी प्रकरणाचा नानलपेठ पोलिसांनी छडा लावत २ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. २४ जुलै रोजी २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर परिसरातून दि. २१ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही इसमांनी एका गोवंशाच्या गळ्यात दोरी बांधून त्याला कारमध्ये टाकून नेले होते. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पोलिसांना निवेदन देऊन तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने तपास करत मुद्दसिर कुरेशी, शेख नोमान तांबोळी या दोघांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास नानलपेठ पोलिस करत आहेत.
















