40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार

छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार

मुंबई : राज्यात महायुती एकत्र लोकसभा निवडणूक लढवत आहे. परंतु काही ठिकाणी नेत्यांमधील आपापसांतील वाद समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीत खळबळ उडाली आहे. आपल्याकडे फोटो आणि व्हीडीओ असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले आहे. दरम्यान सुहास कांदे यांचे आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळले आहेत. भुजबळांवर टीका केल्याने त्याला मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते, म्हणून कांदे असे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नांदगाव मतदारसंघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाली तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हीडीओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.

आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या
छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विरोधी असलेल्या ‘तुतारी’ या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. मंत्रिपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन खुशाल ‘तुतारी’ वाजवावी असे आव्हान आ. सुहास कांदे यांनी केले. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मेळावा आ. कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी ते बोलत होते.

भुजबळांच्या निकटवर्तीयांचे फोटो व्हायरल
भुजबळांचे निकटवर्तीय असलेले विनोद शेलार भगरे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. भास्कर भगरे मतदारसंघात प्रचार करीत असताना भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.

सुहास कांदे यांच्या आरोपावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, कांदे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही महायुतीचे काम करत आहोत. ही आमदारकीची निवडणूक असल्यासारखे काम करून कमळ निशाणी निवडून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुहास कांदे हे आमचे विरोधक आहेत, हे सर्वांना माहीत आहे. ते नेहमीच आमच्याविषयी खोटे बोलतात. भुजबळांवर टीका केल्याने त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते.

भारती पवार यांना दोन कांद्यांच्या त्रास नको
आधीच कांद्याच्या प्रश्नावरून लोक प्रक्षुब्ध असताना आता या कांदेमुळे म्हणजे २-२ कांद्यांचा त्रास भारती पवारांना नको आहे. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने भारती पवारांचे काम करू. तुमच्यामुळे भारती पवारांना मदत होण्यापेक्षा अडचणी निर्माण होत आहेत. आमच्या लोकांना कांदेंबरोबर काम करणे शक्य नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व मदत वैयक्तिकरीत्या करत आहे. आमच्या निष्ठेवर कांदे यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR