पालघर : प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराला सोमवारी रात्री भूकंपाच्या सलग धक्क्यांनी हादरवून सोडले. रात्री १० वाजल्यानंतर काही तासांच्या अंतराने जाणवलेल्या कंपनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली आणि रस्त्यावर आश्रय घेतला. काही नागरिकांनी मध्यरात्रीनंतरही घरात जाणे टाळल्याने जव्हारवासीयांनी अक्षरश: भीतीच्या सावटाखाली रात्र जागून काढली.
सोमवारी रात्री १०.०४ वाजता ३.२ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जव्हार परिसरात जाणवला. या भूकंपाचे केंद्र डेंगाचीमेट परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक घरांमध्ये कंप जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी खबरदारी म्हणून तातडीने घराबाहेर पडत रस्त्यावर थांबणे पसंत केले. काही वेळाने परिस्थिती शांत होत असल्याचे वाटत असतानाच रात्री ११ वाजता पुन्हा ३.४ तीव्रतेचा धक्का जाणवला. या धक्क्याचे केंद्र डेंगाचीमेट गावाजवळील हडे गावातील श्री जगदंबा माता मंदिर परिसर असल्याचे सांगण्यात आले. दुसरा धक्का तुलनेने अधिक तीव्र असल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली.
दोन धक्क्यांनंतरही नागरिकांची भीती कमी झाली नाही. रात्री ११.३९ आणि मध्यरात्री १२.०५ वाजता पश्चात धक्के (आफ्टरशॉक) जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. एखादा मोठा भूकंप पुन्हा होण्याची भीती असल्याने अनेक नागरिक मध्यरात्रीनंतरही काही तास घराबाहेर राहिले. अचानक जाणवणा-या कंपनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. भूकंपानंतर जव्हार शहरात कुर्त्यांचे असामान्य भुंकणे तसेच काही पक्ष्यांचे विचित्र आवाज नागरिकांच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच घाबरलेल्या नागरिकांमध्ये आणखी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
















