24 C
Latur
Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रजालन्यात निवासी क्रीडा मुलींचे लैंगिक शोषण!

जालन्यात निवासी क्रीडा मुलींचे लैंगिक शोषण!

जालना : प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीतील अल्पवयीन मुलींचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात याने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी २६ जुलै रोजी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिका-यांनी केलेल्या चौकशीवेळी मुलींनी खरात याच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. या प्रकारणात खरातविरुद्ध रविवारी रात्री कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना येथे जिल्हा परिषदेच्या वतीने चालविण्यात येणारी निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे. येथे २०१९ पासून खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. या क्रीडा प्रबोधिनीतील मुलांसह मुलींनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. परंतु, त्या क्रीडा प्रबोधिनीतील मुलींचे खरात याने १ जून ते २४ जुलै या कालावधीत लैंगिक शोषण केले.

पालकांनी या प्रकरणात शनिवारी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिका-यांकडे तक्रार धडकताच शिक्षण विभागातील अधिका-यांनी शनिवारीच क्रीडा प्रबोधिनीला भेट देऊन मुलांसह मुलींशी चर्चा केली. चर्चेदरम्यान मुलींनी आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचे केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांच्यासमोर कथन केले. मुलींनी तक्रारी केल्यानंतर या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी रविवारी कदीम पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार व्यवस्थापक प्रमोद खरातविरुद्ध कलम ७४, ७५ भा. न्या. संहिता २०२३ सह कलम ८, १०, १२ पोक्सोसह कलम ७५ बाल न्याय अधिनियम (काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. आरती जाधव या करीत आहेत.

सीसीटीव्ही नसलेल्या भागात कृत्य
मुलींना विविध कारणांनी सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी नेले जात होते. तेथे विविध कारणांनी मुलींना वाईट हेतूने स्पर्श करून लैंगिक शोषण करीत असल्याच्या तक्रारी मुलींनी केल्या आहेत.

चार मुलींच्या तक्रारी
शिक्षण विभागातील अधिका-यांनी आणि पोलिस अधिका-यांनी भेटी दिल्यानंतर या प्रकरणात प्रारंभी चार मुलींनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर इतर सात ते आठ मुलींनीही शिक्षण विभागाच्या अधिका-यांकडे खरात याच्या काळ्या कारनाम्याबद्दल तक्रारी केल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवसांची पोलिस कोठडी
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी प्रमोद खरात याला रविवारी रात्री अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR