नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरची झळ भारतालाही बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने आधी कॅनडा, मेक्सिको, चीन या देशांवर ‘टेरिफ’ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता २ एप्रिलपासून भारतावरही ‘टेरिफ’ लावण्याचा निर्णय ट्रम्प सरकारने घेतला आहे. याचा फटका भारतातून अमेरिकेत निर्यात होणा-या विविध वस्तूंना बसणार आहे. सोबतच अमेरिकेलाही या टॅरिफ वॉरमुळे अंशत: नुकसान सोसावे लागणार आहे.
टेरिफ वाढल्याने कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. तसेच कंपन्या या वाढत्या खर्चाची वसुली ही वस्तूंच्या किमती वाढवून करतील. तसेच टॅरिफमुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तर त्याचा फटका अमेरिकेतील नागरिकांनाही बसणार असून, त्यांना या वस्तू चढ्या दराने खरेदी कराव्या लागतील. भारत अमेरिकेमध्ये ज्या वस्तूंची निर्यात करतो त्यामध्ये प्रामुख्याने मखना, गोठवलेली कोळंबी, मसाले, बासमती तांदूळ, काजू, फळे, भाज्या, तेल, स्वीटनर, प्रक्रिया केलेली साखर, मेवा, धान्य, पेट्रोलियम, कच्चे हिरे, एलपीजी, सोनं, कोळसा, बदाम, संरक्षण सामुग्री, इंजिनियरिंगची अवजारे, इलेक्ट्रॉनिक सामान, औषधे, आदींचा समावेश आहे. आता अमेरिकेने टॅरिफ वाढविल्यास या वस्तू अमेरिकेत महाग होतील, अमेरिका हा बासमती तांदूळांचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे बासमती तांदूळही अमेरिकेत महाग होईल. मात्र अमेरिकेने टॅरिफ वाढवल्याचा भारताच्या निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे.
त्याशिवाय टॅरिफ वाढवल्याने भारतीय ज्वेलरी ब्रँड्ससाठी अमेरिकेमध्ये स्पर्धा करणं कठीण होणार आहे. अमेरिकेत मागणी असलेल्या भारतीय साड्या आणि कुर्ते टॅरिफ वाढल्याने महाग होऊ शकतात. भारतीय कंपन्यांसाठी अमेरिकेमध्ये व्यापार करणं महाग पडू शकतं. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. टॅरिफ वाढल्याने भारतातून निर्यात होणा-या अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार तोट्यात जाऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवही विपरित परिणाम होऊ शकतो.