Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा मालिका विजय

दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा मालिका विजय

अखेरच्या सामन्यात तिलक-हार्दिकची फटकेबाजी
अहमदाबाद : वृत्तसंस्था
तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याच्या धमाकेदार फलंदाजीनंतर बुमराहने मोक्याच्या क्षणी क्विंटन डीकॉकची घेतलेली विकेट आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जादू याच्या जोरावर भारतीय संघाने अहमदाबादचे मैदान मारत ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने खिशात घातली. टी-२० वर्ल्ड कपपासून चालत आलेला हा मालिका विजयाचा सिलसिला वर्षअखेरपर्यंत कायम राखण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली. सलग ८ व्या मालिका विजयासह संघाने घरच्या मैदानातील टी-२० मालिकेसाठी तयार असल्याचे संकेत दिले.

हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने द. आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावून तब्बल २३२ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना वरुण चक्रवर्तीच्या घातक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेने सपशेल शरणागती पत्करली. तत्पूर्वी भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो ५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: हल्ला चढवला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत १०५ धावांची तुफान भागीदारी केली. हार्दिक पांड्याने २५ चेंडूत ६३ धावा करताना ५ चौकार आणि ५ षटकार लगावले तर तिलक वर्माने ४२ चेंडूत ७३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. ज्यात १० चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तो अखेरच्या षटकात रनआउट झाला. शिवम दुबे १० धावांवर नाबाद राहिला.

भारताच्या २३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला क्विंटन डीकॉकने आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र त्यांचा सलामीवीर साथीदार रिझा हेंड्रिक्स अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकला नाही. तो १३ धावा करून बाद झाला. यानंतर डीकॉकने ३५ चेंडूंमध्ये ६६ धावांची शानदार खेळी साकारली. परंतु त्यानंतर एकानंतर एक फलंदाज बाद होत गेल्याने निर्धारित षटकांत दक्षिण आफ्रिकेला ८ गडी गमावून २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ३ सामने जिंकले तर द. आफ्रिकेला एकाच सामन्यात विजय मिळविता आला तर एक सामना रद्द झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR