लातूर : प्रतिनिधी
यंदाची दिवाळी दुष्काळाच्या सावटाखाली साजरी होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊनही बाजारपेठेत म्हणावीशी रौनक नाही. बाजारपेठेत आकाशकंदिलांची मोठी रेलचेल असली तरी ग्राहकांची वर्दळ वाढलेली नाही. यंदाच्या आकाशकंदिलांचे वैशिष्ट्ये म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिककडे पाठ फिरवत कागदी आणि कापडापासून तयार केलेल्या इकोफे्रेंडली आकाशकंदिलांना पसंती दर्शवत आहेत.
दिवाळीनिमित्त बाजारपेठ विविध वस्तुंनी सजायला सूरुवात झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईसह शहरातील औसा रोड, अंबाजोगाई रोड, बाशी रोड आदी भागांतील मुख्य चौकांमध्ये दिवाळीचा बाजार थाटला जात आहे. दिवाळीनिमित्त विविध सेल, प्रदर्शने, वस्तूंवर १० ते २० टक्क्यांपर्यंत सूट देणा-या जाहिरातीही झळकू लागल्या आहेत. शहरात विविध भागांत विविध प्रकारचे सुंदर-सुबक नक्षीकाम केलेले आकाशकंदील दाखल झाले आहेत. रंगबेरंगी कागद, ओरिगामी आर्ट, वेगवेगळी कलाकुसर करुन तयार केलेले कागदी आकाशकंदील आणि बांबुच्या काड्यांचा वापर करुन तयार केलेले व वुडनचे आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत.
दिवाळी सुरू होण्यापूर्वीच घरातील लहान-मोठे सर्वजण मिळून आकाशकंदील आणतात किंवा घरी तयार करतात. धनत्रयोदशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा आकाशकंदील संध्याकाळी लावला जातो. त्याच्या लुकलुकणा-या प्रकाशात अवघे रस्ते आणि घरे उजळून निघतात. आकाशकंदीलाशिवाय दिवाळीची सजावट अपूर्ण वाटते. त्यामुळे सध्या सर्वांचाच आकाशकंदील खरेदी करण्यातकडे कला वाढला असला तरी दुष्काळामुळे क्रयशक्ती कमी झाल्याने गरजेपूरतेच खरेदी केली जात आहे.
















