लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक
सर्जेराव मोरे बिनविरोध! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी ४ जणांचे ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र काय राहिल, याची उत्सुकता शिगेला पोहोंचली आहे. दरम्यान रेणापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून सर्जेराव मोरे बिनविरोध येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून दत्तू निवृत्ती आल्टे, मत्स्य सहकार संस्था, कुक्कुटपालन सहकारी संस्था मतदारसंघातून राजकुमार भाऊराव जाधव, विकास संस्था तालुका चाकूर मतदारसंघातून प्रदीप नारायण जाधव, अनुसूचित जाती किंवा जमाती मतदारसंघातून तसेच महिला प्रतिनिधी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातून रुचिका सिद्धेश्वर कावळे यांनी माघार घेतली आहे. दरम्यान सोमवारी भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून संभाजी सूळ, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून अनुप शेळके, विकास कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघ रेणापूर या मतदारसंघातून उमाकांत देशमुख, शिरुर अनंतपाळ सोसायटी मतदारसंघातून ज्ञानोबा सूर्यवंशी आणि जयेश माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
















